नंदुरबारमध्ये सहा लाखांचा फ्लिपकार्ट पार्सल घोटाळा उघडकीस : त्रिकूट जाळ्यात
नंदुरबार शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी : ग्राहकांच्या पार्सलमधील नवीन वस्तू बदलून जुन्या वस्तू ठेवत होते त्रिकूट
Rs 6 lakh Flipkart parcel scam unearthed in Nandurbar; trio netted नंदुरबार (शनिवार, 18 जुलै 2026) : ऑनलाईन शॉपिंग करणार्या ग्राहकांच्या विश्वासाला तडा देणारा धक्कादायक प्रकार नंदुरबार शहरात उघडकीस आला आहे. फ्लिपकार्ट कंपनीच्या पार्सलमधील ग्राहकांनी मागविलेल्या नवीन वस्तू काढून त्याऐवजी त्याच प्रकारच्या जुन्या अथवा इतर वस्तू ठेवून फसवणूक करणार्या तिघा आरोपींना नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून आतापर्यंत सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 10 एलईडी टीव्ही, पॅनासोनिक कंपनीचा एसी, गिझर, मॉप सेट तसेच स्मार्ट होम थिएटर यांचा समावेश आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार राकेश मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत काही डिलिव्हरी बॉय ग्राहकांनी मागविलेल्या नवीन वस्तू पार्सलमधून काढून त्याऐवजी जुन्या अथवा इतर वस्तू ठेवून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची माहिती 13 रोजी मिळाली व त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाला वेग दिला.


फ्लिपकार्ट व्यवस्थापकाची तक्रार
या प्रकरणी फ्लिपकार्ट कंपनीचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसेन यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी अशा प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी यापूर्वीही प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच संबंधित वस्तूंची किंमत संबंधित कर्मचार्यांच्या वेतनातून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तक्रारीनुसार, ग्राहकांनी मागविलेल्या वस्तू पार्सलमधून काढून त्याऐवजी जुन्या किंवा इतर वस्तू ठेवण्यात येत होत्या त्यामुळे ग्राहकांकडून चुकीच्या वस्तू कंपनीकडे ‘रिटर्न’ केल्या जात होत्या. या प्रकारामुळे ग्राहकांसह फ्लिपकार्ट कंपनीची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आरिफ हुसेन यांच्या फिर्यादीवरून पर्वेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार आणि राज विनोद मराठे (सर्व रा. नंदुरबार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींनी विक्री केलेल्या वस्तूंचा शोध घेत पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध नागरिकांकडून सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 10 एलईडी टीव्ही, पॅनासोनिक कंपनीचा एसी, एक गिझर, एक मॉप सेट तसेच स्मार्ट होम थिएटर यांचा समावेश आहे.
ऑनलाईन खरेदी करताना सावध राहा : पोलिसांचे आवाहन
नंदुरबार शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाईन खरेदी करताना पार्सल स्वीकारण्यापूर्वी शक्य असल्यास त्याची खात्री करावी तसेच अत्यल्प किमतीत उपलब्ध असलेल्या महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या चोरीच्या, अपहार केलेल्या किंवा फसवणुकीतून मिळालेल्या नाहीत ना, याची पडताळणी करावी. संशयास्पद व्यवहार किंवा माहिती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
या अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या नंदुरबार शहरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे, पोलीस हवालदार जगदीश पाटील, प्रशांत पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे, राहुल राठोड, अनिल वसावे, रुपेश पगारे, राजेंद्र कटके, ललित गवळी, अमित भरवाड आणि निंबाबाई वाघमोडे आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.