अपघात रोखण्यासाठी धडक मोहिम : भुसावळातील राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे थांबणार्‍या अवजड वाहनांवर कारवाई

खडका चौफुली ते नाहाटा चौफुलीदरम्यान दररोज शहर वाहतूक शाखेकडून कारवाई


भुसावळ (शनिवार, 18 जुलै 2026) : भुसावळ शहरातील खडका चौफुली ते नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीदरम्यान अवैधरित्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहणार्‍या वाहनामुळे अपघाताचा धोका लक्षात घेता शहर वाहतूक शाखेचे नूतन सहाय्यक निरीक्षक राहुल भंडारे यांच्या नेतृत्वात दररोज धडक कारवाई मोहिम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष धडक मोहिम राबवल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. नियमभंग करणार्‍यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा शहर वाहतूक पोलीस प्रशासनाने दिला आहे.

दररोज होतेय कारवाई
राष्ट्रीय मार्गावर अनेक वाहनचालकांकडून रस्त्याच्या कडेला कार, मालवाहू वाहने आणि दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीचा वेग मंदावत होता. यामुळे वाहतूक कोंडी, पादचार्‍यांची गैरसोय तसेच अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत होता. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.म


वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणार्‍या वाहनांवर जागेवरच दंड आकारण्यात येत आहे. काही वाहनचालकांना समज देण्यात आली असून, वारंवार नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग हा वेगवान वाहतुकीचा मार्ग असल्याने रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा वाहनांमुळे गंभीर अपघात होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे वाहतुकीची सुरक्षितता आणि सुरळीत व्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई अटळ
सहा.निरीक्षकराहुल भंडारे यांनी वाहनचालकांना आवाहन करताना सांगितले की, वाहतूक नियमांचे पालन करून केवळ अधिकृत पार्किंगचाच वापर करावा. महामार्गावर अनधिकृतरीत्या वाहने उभी करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई भविष्यातही सातत्याने सुरू राहील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !