केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला : राजीनामा देणार ?
नवी दिल्ली (सोमवार, 20 जुलै 2026) : दिल्लीतील आंदोलन व सर्व घडामोडींच्या आता एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी रवाना झाले असून ते राजीनामा देतील? अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीत सर्वत्र गोंधळाचे वातावरण
दिल्लीमध्ये सध्या मोठ्या गोंधळाचं चित्र दिसून येत आहे. दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतर-मंतरवर पोलीस आणि सुरक्षा दलांनी आक्रमक स्वरुप धारण केले आहे. कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती. यावरुन दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. त्यामुळे शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आंदोलकांवर लाठीमार केला.
आंदोलकांची राजीनाम्याची मागणी
सीजेपीच्या आंदोलनाची मुख्य मागणी ही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे तर त्याला पार्श्वभूमी आहे नीट पेपरफुटीची, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेच्या दिशेने मोर्चा सुरू असतानाच, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, ‘सीजेपी’च्या मागण्यांनुसार ते आपल्या पदाचा राजीनामा देतील का? असा प्रश्न आहे.
स्वतःहून राजीनामा द्यावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, त्यांना जरा तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल, तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी तो दिला असता तर हे प्रकरण इतकं वाढलं नसतं. त्यांची ती एकच तर मागणी होती, त्यात एवढं काय मोठं होतं? त्याने देशाचं काय नुकसान होणार होतं? जाणीवपूर्वक अशा पद्धतीने आंदोलकांना मारहाण करण्यापर्यंत तुमची मजल जाते? शांततापूर्ण आंदोलन झालं होतं, काल शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात आलं, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं, त्यानंतर आता अनेक ठिकाणी तरुण वर्ग रस्त्यावर उतरला आहे. तुम्ही जितक्या बळाचा वापर कराल, तितक्याच तीव्र प्रतिक्रिया उमटतील हे लक्षात ठेवा, असा इशाराही सावंत यांनी पुढे दिला.



