भुसावळातील सेंट अलॉयसीस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण
भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहरातील सेंट अलॉयसीस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली.
उपक्रमाचे नेतृत्व शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन यांनी केले. यावेळी सिस्टर शोभना, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, तसेच शिक्षिका रेखा चौधरी, शिक्षक सागर, मिस सिलिना आणि अनेक पालक उपस्थित होते.
शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह वृक्षारोपण करून त्यांची नियमित देखभाल करण्याचा संकल्प केला. पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.




