भुसावळातील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आषाढी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा
भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : शहरातील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आषाढ महिन्यानिमित्त रेल्वे फिल्टर हाऊस येथील श्री हनुमान मंदिर परिसरात आषाढी उत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम नामजपाने लताताई बेंडाळे यांनी केली. त्यानंतर प.पू.गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे वाचन सौ. प्रतिभाताई फालक यांनी भावपूर्ण शैलीत केले. त्यांच्या ओजस्वी वाचनाने उपस्थितांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माची भावना जागृत झाली.
यानंतर प्रकाश हंसकर यांनी विठ्ठलाच्या भक्तिगीताने गायनास सुरुवात केली. इतर पुरुष बांधवांनी भाग घेतला.तसेच उपस्थित महिला भगिनींची सुंदर साथ लाभली आणि इतर महिला भगिनींनी गाणे गायले.विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या मधुर सुरांनी मंदिर परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला.
महिलांच्या उत्साह आणि आनंद यासाठी विजया निकम आणि संजीवनी क्षिरसागर यांनी एक खेळ आयोजित केला. त्यात महिला भगिनींनी उत्साहात सहभाग आणि आनंद घेतला. त्यात सुनीता वाघमारे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना संघाच्या अध्यक्षा अलका ढाके यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. महिलांमध्ये संघ भावना आणि कौशल्य हे गुण खेळाद्वारे दिसले.
यानंतर सर्व ज्येष्ठ बंधू-भगिनींनी उत्साहात दिंडी काढली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा-तुकाराम यांच्या जयघोषात टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय केला. प्रत्येकाच्या चेहर्यावर भक्तीचा आनंद आणि समाधान झळकत होते.
दिंडी एल्लम्मा मातेच्या मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर महिला भगिनींनी पारंपरिक रिंगण घालून विठ्ठलभक्तीचा अनोखा आविष्कार साकारला. अनेक महिलांनी फुगड्या खेळत भक्तीचा आनंद द्विगुणित केला. पुरुष बांधवांनीही टाळ-मृदुंगाच्या तालावर रिंगणात फेर धरून उत्स्फूर्त नृत्य केले. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी दिंडीचे आकर्षण अधिकच वाढविले.
त्यानंतर श्री हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. आरतीनंतर भगवंताला नैवेद्य अर्पण करण्यात आला. प्रसाद व महाप्रसादाचा सर्व उपस्थितांनी आनंदाने आस्वाद घेतला. हा उत्सव ज्येष्ठ नागरिकांसाठी भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेची संस्मरणीय पर्वणी ठरला.सूत्रसंचालन अशोक निकम यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम श्री गजानन दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. सचिव गजानन सेवलकर, दिनकर बेंडाळे, विकास टोपरे, रत्नाकर क्षिरसागर, सुरेश भामरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले. साऊंड सिस्टिमसाठी प्रकाश ठाकुर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण गजानन ठाकूर यांनी उत्कृष्टरीत्या केले. मंदिरातील पुंडलिक सोनवणे यांचेही या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
आषाढी उत्सवाने भक्ती, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम घडवून आणत सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मनात अविस्मरणीय आनंदाच्या आठवणी निर्माण केल्या.




