भुसावळात राहुल गांधींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
वक्तव्याचा भाजयुमो पदाधिकार्यांकडून तीव्र निषेध
भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जळगाव पूर्व जिल्ह्याच्या वतीने गुरुवार, 23 रोजी नाहाटा चौफुलीजवळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.
घोषणांनी शहर दणाणले
आंदोलनाचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सदाशिव सावळे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान परिसरात घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थितांनी देशहित आणि समाजहिताला बाधा आणणार्या कोणत्याही वक्तव्याचा विरोध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने यावेळी इशारा देण्यात आला की, देशविरोधी अथवा समाजविरोधी भूमिकेविरोधात पक्ष यापुढेही रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने संघर्ष करत राहील. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांना कडाडून विरोध केला जाईल, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजयुमो व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



