भुसावळात सीआरपी महिलांच्या मेळाव्यात आर्थिक साक्षरतेचे धडे

प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे उपक्रमाचे आयोजन : शंभरावर महिलांचा प्रमाणपत्र, साडी-चोळी देवून सन्मान


भुसावळ (25 जुलै 2026) : सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने भुसावळ शहरातील तेरापंथ भवनात शनिवार, 24 जुलै रोजी सीआरपी महिलांचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध भागांतील सीआरपी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला व उपस्थित बँक अधिकार्यांनी सीआरपी महिलांना बचत गट, कर्ज योजना, स्वयंरोजगार, आर्थिक नियोजन, डिजिटल बँकिंग तसेच शासनाच्या विविध आर्थिक योजनांची सविस्तर माहिती दिली. सीआरपी महिलांनीही विविध शंकांचे निरसन करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या चळवळीतील दुवा
प्रास्ताविकात प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, सीआरपी महिला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कार्यामुळे महिला बचत गटांची गुणवत्ता वाढली असून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सीआरपी महिला या स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीतील एक महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचे उमेद अभियान असो की शासनाचे अन्य काम प्रत्येक वेळी या महिलांनी चांगले काम केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन रजनी सावकारे यांना दिले व त्यानंतर लागलीच मंत्री संजय सावकारे यांच्याकडे हे निवेदन पाठवले व प्रलंबित समस्या लवकरच निकाली निघतील, असे आश्वासन यावेळी मंत्री सावकारे यांनी यावेळी दिले.

आर्थिक साक्षरतेचे महिलांना धडे
या कार्यक्रमात काईट फोरम संस्थेचे अध्यक्ष शांताराम बडगुजर व संचालक सागर पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देत ग्रामीण भागातील सीआरपी महिलांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन मेळाव्यातून आगामी काळात ग्रामीण भागातील महिलादेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम साक्षर होणार आहेत. प्रसंगी शंभरावर सीआरपी महिलांचा गौरव प्रमाणपत्र तसेच साडी-चोळी देवून सन्मान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सोनल महाजन, प्राची पाटील, सीमा नरवाडे, अर्चना सातदिवे, शोभा इंगळे आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, सोनल महाजन, वंदना सोनार, पल्लवी वारके आदींनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !