आषाढी एकादशीनिमित्त भजन-कीर्तनाचा मेळावा : वासुदेव ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डचे वाटप
भुसावळ (रविवार, 26 जुलै 2026) : आषाढी एकादशीचे औचित्य साधत ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जळगाव रोडवरील रामदेव बाबा योग हॉल येथे भव्य भजन-कीर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात आले.
टाळ-मृदुंगाचा गजर
मेळाव्यात माऊली भजनी मंडळाच्या वारकरी मंडळींनी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. टाळ-मृदंगाच्या निनादाने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक व भाविकांनी हरिनाम संकीर्तन व कीर्तनाचा मनसोक्त आनंद घेतला.
भजन-कीर्तनाच्या साक्षीने सामूहिक वाढदिवस साजरा
कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे चालू महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा संघातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संजीव चौधरी, हरी पाटील, रमेश पाटील, रत्नप्रभा बोरोळे, राजेश सावळे, विकास राणे, ज्योती चौधरी आदी सदस्यांचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. केक कापण्याऐवजी संतपरंपरेचा सन्मान राखत भजन-कीर्तनाच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. संघाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
ज्येष्ठ नागरिकांना ‘एनसीएमसी’ कार्डचे वितरण
धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमाची जोड देत संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना ‘एनसीएमसी’चे वितरण करण्यात आले. सार्वजनिक वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार्या या डिजिटल कार्डमुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास अधिक सुलभ होणार आहे. शासनाच्या विविध सुविधांचा लाभ घेण्यासही मदत होणार आहे. या उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांनी संघाचे आभार व्यक्त केले. यशस्वी आयोजनासाठी संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.



