विद्यार्थ्यांच्या मराठमोळ्या लेझीमने वेधले लक्ष : आषाढीनिमित्त विवेकानंद विद्यामंदिराची भक्तिमय दिंडी
भुसावळ (सोमवार, 27 जुलै 2026) : आषाढी एकादशीचे औचित्य साधत विवेकानंद बहुउद्देशीय संस्था संचलित भुसावळातील विवेकानंद विद्यामंदिरातर्फे भक्तिमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी संस्थाध्यक्ष जयंतीलाल सुराणा, उपाध्यक्ष अक्षय सराफ, संस्थेचे संचालक प्रसन्न गंधे, नरेंद्र अकोले, संजय कुलकर्णी, प्रा.डॉ.संजय चौधरी, विजय चोरडिया, चेतन शर्मा, मुख्याध्यापिका सुनंदा खरे, पालकवृदांनी दिंडीचे पूजन केले.

दिंडीने वेधले लक्ष
शाळेच्या या दिंडीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठमोळ्या लेझीमच्या दिमाखदार आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने सर्वांचे विशेष लक्ष वेधले. लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेला पारंपरिक खेळ उपस्थितांकडून उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद मिळवत कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला.
टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या गजरात निघालेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गजर केला. ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
मुख्याध्यापिका सुनंदा खरे यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीतील आषाढी एकादशीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे दिंडीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अनुभव मिळाला तसेच वारकरी संप्रदायातील भक्ती, शिस्त, एकता आणि संस्कार यांचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली. उपस्थित पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या लेझीम सादरीकरणाचे आणि शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.