कविता भाषा, प्रदेशाच्या पलीकडे जाऊन थेट अंतःकरणाला भिडते

द्वारकाई व्याख्यानमाला : द्वितीय पुष्प गुंफताना विशाल उशिरे आणि विशाल खोंदलेंचे मत


कुर्‍हेपानाचे (शनिवार, 1 ऑगस्ट 2026) : कविता हे मानवी भावना, वेदना आणि आनंदाला शब्दांत मांडणारे एक प्रभावी माध्यम आहे. ती भाषा आणि प्रदेशाच्या पलीकडे जाऊन थेट अंतःकरणाला भिडते. समान विचार आणि संवेदनांमधून कविता माणसांना विचारांच्या पातळीवर एकत्र आणते असे मत रायगडचे विशाल उशिरे, बुलढाण्याचे विशाल खोंदले यांनी व्यक्त केले.

भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे द्वारकाई कालिदास नेमाडे तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. द्वितीय पुष्प तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील रा. धों. माध्यमिक विद्यालयात गुंफण्यात आले. त्यात ‘माणसं जोडणार्‍या कविता’ या विषयावर ते बोलत होते. या उपक्रमाचे यंदा तेरावे वर्ष आहे.

यांची विचार मंचावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर होते. विचारमंचावर संस्थेच्या उपाध्यक्षा भावना बडगुजर, सचिव प्रमोद छाजेड, संचालक घनशाम बडगुजर, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे, मुख्याध्यापक एस. डी. वाघ व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. गवळी यांनी केले. ‘द्वारकाई’ व्याख्यानमाला भुसावळसह परिसरातील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन, मननाची गोडी लागण्यासाठी त्यातून मदत होईल, अशी भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर यांनी व्यक्त केली.

कविता स्नेहाचे धागे घट्ट विणते
जेव्हा एखादी रचना लोकांच्या भावनांना स्पर्श करते, तेव्हा परस्परसंवाद वाढतो व एकमेकांमधील अंतर मिटून आपुलकीचे, स्नेहाचे धागे घट्ट विणले जातात. शिक्षण व्यवस्थेतील शिक्षकाचे उत्तरदायित्व सांगताना कवी उशिरे यांनी ‘ज्यावेळी विद्यार्थी झोपलेला असेल, त्यावेळी शिक्षक जागा असला पाहिजे’ ही महत्त्वपूर्ण ओळ सादर केली. विद्यार्थी जेव्हा अज्ञानात किंवा गाफील असतो, तेव्हा त्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी शिक्षकाने निरंतर सजग आणि जागृत राहिले पाहिजे, हा मोलाचा संदेश दिला.

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत
कवी विशाल खोंदले यांनी आपल्या कवितेतून मातीशी जुळलेले नाते आणि मानवी मूल्यांचा सुंदर संदेश दिला. माणूस कसा असावा आणि माणसाने माणसाला कसे जोडावे, यावर भाष्य करणार्‍या ’माणसं जोडणार्‍या कविता’ सादर केल्या. समाजात वाढणार्‍या दुराव्याच्या काळात माणुसकी टिकवण्याचा संदेश त्यांच्या कवितेने दिला. शेतकर्‍याचे जीवन आणि मातीची महती सांगताना त्यांनी, बापाचे कष्ट आणि ’शेती-मातीच्या कविता’ सादर करून ग्रामीण भागाचे वास्तव मांडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकली पाहिजे, हा अत्यंत कळीचा मुद्दा त्यांनी मांडला.

बुद्ध, बाबासाहेब आत्मसात करा
आईच्या वात्सल्याची महती सांगणारी ‘आई’ व बापाच्या त्यागाचे दर्शन घडवणारी ‘बाप’ या कविता उशिरे यांनी सादर केल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कर्तृत्वाला उजाळा देणारी ‘शिवराय’ ही कविता सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवले. भगवान बुद्धांनी दिलेली प्रज्ञा, शील आणि करुणेची शिकवण जेव्हा समाजात रुजते, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव निर्माण होऊन शोषित-वंचितांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळते असेही त्यांनी नमूद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !