भुसावळ तालुका शासकीय क्रीडा स्पर्धांच्या तयारीला वेग : सहविचार सभा उत्साहात
52 क्रीडा शिक्षकांची उपस्थिती ; स्पर्धांचे वेळापत्रक, स्थळ निश्चित तर गुणवंत क्रीडा शिक्षकांचा गौरव
भुसावळ (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : भुसावळ तालुका शासकीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन अधिक प्रभावी व यशस्वी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा गुरुवार, 30 रोजी पु. ओ. नाहाटा महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला तालुक्यातील 52 क्रीडा शिक्षक-शिक्षिकांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम, क्रीडा अधिकारी सचिन निकम, डॉ. सुरेश थुरकुडे, विशाल बोडके, प्रा. डॉ. संजय चौधरी, वाय. एम. पाटील, आर. आर. धनगर, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे, जिल्हा क्रीडा संकुलाचे माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ.प्रदीप साखरे यांनी केले. त्यांनी तालुका क्रीडा स्पर्धांच्या नियोजनापासून ते यशस्वी अंमलबजावणीपर्यंतच्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विलास पाटील यांनी सलग तीन वेळा टाटा मुंबई मॅरेथॉन (42 कि.मी.) पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अनिल महाजन, डी.आर.धांडे आणि आर.एस.कुरेशी यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गौरविण्यात आले. रितेश तायडे यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. मागील वर्षी शासकीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणार्या ताप्ती पब्लिक स्कूल, सेंट अलॉयसिस स्कूल आणि बियाणी मिलिटरी स्कूल येथील क्रीडा शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी सर्व मुख्याध्यापकांनी शासकीय क्रीडा स्पर्धांना पूर्ण सहकार्य करून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. डॉ. सुरेश थुरकुडे यांनी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी सर्वांनी समन्वयाने कार्य करून अधिकाधिक खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
सभेत विविध क्रीडा स्पर्धांचे स्थळ व वेळापत्रक निश्चित करण्यात आले. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतानाच पालकांमध्ये शासकीय क्रीडा स्पर्धांविषयी जनजागृती करण्यावर विशेष भर देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
सूत्रसंचालन विलास पाटील तर आभार प्रा.मनोज वारके यांनी मानले. यशस्वीतेसाठी पु.ओ.नाहाटा महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे भुसावळ तालुका पदाधिकारी तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.