गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांच्या प्रेरणादायी फलकलेखनाने वेधले लक्ष

कळमडू देवळी व वाघळी विद्यालयातील उपक्रमांचे सर्वत्र कौतुक


भडगाव (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : गुरुपौर्णिमेनिमित्त तालुक्यातील विविध शाळांमध्ये गुरूंच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्य परंपरेविषयी आदरभाव जागृत करण्यासाठी प्रेरणादायी फलकलेखन, सांस्कृतिक उपक्रम आणि गुरुवंदना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

चाळीसगाव रा.स. शि. प्र. मंडळ संचलित कळमडू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक घनश्याम बोरसे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अत्यंत आकर्षक व प्रेरणादायी फलकलेखन करून विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सुंदर हस्ताक्षरातून साकारलेल्या संदेशाचे सर्वत्र कौतुक झाले.

देवळी माध्यमिक विद्यालयात शिक्षक जी. टी. जाधव यांनीही गुरूंच्या महत्त्वावर आधारित प्रभावी फलकलेखन साकारले. दोन्ही विद्यालयांतील उत्कृष्ट फलकलेखन गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरले.

दरम्यान, वाघळी विद्यालयाचे सेवक रवींद्रभाऊ संभाजी वाघ यांचा सेवाभाव आणि अध्यात्मिक जीवनप्रवासही यानिमित्ताने चर्चेचा विषय ठरला. श्री विठ्ठल मंदिरात अनेक वर्षे त्यांनी निस्वार्थ सेवा केली असून, वेरूळ येथील श्री संत जनार्दन स्वामी देवस्थानात शिक्षण व अध्यात्माचे संस्कार त्यांनी आत्मसात केले आहेत. श्री जनार्दन स्वामी यांच्यावरील त्यांची अखंड श्रद्धा आजही कायम असून, नियमित पूजा-अर्चा करत ते विद्यालयातील जबाबदार्‍याही प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.

गुरूंचे मार्गदर्शन, भक्ती, संस्कार आणि सेवाभाव यांचा संगम म्हणजेच गुरुपौर्णिमा असल्याची भावना या उपक्रमांतून व्यक्त झाली. वाघळी विद्यालयातील देशभक्ती, संस्कार आणि अध्यात्मिक वातावरणामुळे गुरुपौर्णिमेच्या आठवणींना विशेष उजाळा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याबाबतची माहिती गोंडगाव विद्यालयाचे कर्मचारी व पत्रकार अशोकबापू परदेशी यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !