भुसावळकरांना आर.एफ.वीज मीटरची डोकेदुखी


वीज बिलांचा घोळ कायम : न्यायासाठी मुख्य अभियंत्यांकडे तक्रार

भुसावळ : शहरातील वीज ग्राहकांकडे लावण्यात आलेल्या आर.एफ.वीज मीटरबाबत दिवसागणिक तक्रारी वाढल्या आहेत. आमदार संजय सावकारे यांनीदेखील या मीटर संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करीत लक्ष घालण्याचे सांगितले होते मात्र अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नसल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. चुकीच्या, जास्तीच्या बिलाचा फटका वीज ग्राहकांना बसू नये यासाठी प्रा.धीरज पाटील यांनी जळगाव मुख्य अभियंता दीपक कुमठेकर तसेच मुख्यमंत्री कार्यालय, ऊर्जा मंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

आरएफ तंत्रज्ञानाचा फुसका बार फुटला
आरएफ तंत्रज्ञानामुळे थेट महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद होऊन वीज ग्राहकाला अचूक वीजबिल दिले जाईल, वीज चोरीस आळा बसेल, वीज गळतीचे प्रमाणही कमी होईल अश्या प्रकारची आश्वासने ग्राहकांना वीज वितरण कंपनीचे भुसावळ विभागातील कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांनी दिले असलेतरी अनेक ग्राहकांना अवाजवी बिले प्राप्त झाल्याची तक्रार आहे. शहरातील वीज ग्राहक सुमन रमेश कोलते (117750268603) यांनादेखील सरासरी देयक दिले गेले तर जुलै-ऑगस्ट महिन्याचे मीटर खराब म्हणजेच फॉल्टीचे देयक आले. याचाच अर्थ निव्वळ चार महिन्यात नवीन आर.एफ.तंत्रज्ञानाचे मीटर खराब झाले तर रमेश पितांबर खैरनार (117750248319) व श्रीनगर परीसरातील दोन हजारग्राहकांना सरासरी देयक दिले देण्यात आले. मुळात वीज कंपनीला एकापेक्षा अधिकवेळा सरासरी देयक देता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे तीन महिन्यापेक्षा जास्त सारसरीचे देयक सुधारीत केले जात नाही. हा ग्राहकांना सर्वात मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

देयकांमधील सावळा-गोंधळ
वेडीमाता मंदिर परीसरातील सुरेश पुंडलिक पाटील (117758424965) यांना मागील पाच महिन्यापासून चुकीचे देयक मिळत आहे. या महिन्यात त्यांना 230 युनिट चालू रीडींगचे बिल मिळाले, जेथे त्यांचा आजचा वापर केवळ 128 युनिट झालेला आहे. अश्या अनेक तक्रारी प्रा.धीरज पाटील यांच्याकडे दाखल झालेल्या असून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा लेखा जोखा मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आल्याचे प्रा.पाटील यांनी कळविले आहे. महावितरण विरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असून नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रा.धीरज गणेश पाटील यांनी केले आहे.


कॉपी करू नका.