पावसाच्या पाण्याने मोसंबी बाग जलमय : बांबरुड प्र. ब. येथील शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान

शेतात पाणी साचल्याने फळांची मोठ्या प्रमाणात गळती : पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाईची मागणी


भडगाव (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ब. शिवारात अतिवृष्टीमुळे मोसंबी उत्पादक शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. येथील इंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांच्या गट क्रमांक 150/1 मधील साडेतीन एकर क्षेत्रावरील मोसंबी बागेत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने संपूर्ण बाग अक्षरशः जलमय झाली आहे.

सततच्या पावसामुळे शेतात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, झाडांच्या मुळांभोवती पाणी साचल्याने मोसंबीच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. परिणामी शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच दीर्घकाळ पाणी साचल्यास झाडांच्या वाढीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन मोसंबी बागेची पाहणी करावी, नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा आणि बाधित शेतकर्‍यास लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी इंद्रसिंग छगनसिंग परदेशी व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !