स्व.बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
जळगाव (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन तर्फे स्व. बबन भाऊ बाहेती यांच्या जयंतीनिमित्त 1 व 2 ऑगस्ट दरम्यान कांताई सभागृहात आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या नईम अन्सारीने भुसावळच्या कॅरम क्लबचे दानिश शेखचा 18-16 आणि 25-12 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. त्याला रोख रुपये 4000/- आणि चषक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दानिश शेख याला रोख रुपये 3000/- व चषक प्राप्त झाले. तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या अय्युब खान व रईस शेख यांना प्रत्येकी 1500/- रुपये व चषकाने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात नईम अन्सारीने अय्युब खान (तमन्ना कॅरम) याचा 25-04 व 25-06 असा पराभव केला आणि दुसर्या उपांत्य सामन्यात दानिश शेख याने रईस शेख (तमन्ना कॅरम) याचा 19-08 आणि 19-17 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. स्पर्धेत 5 ते 8 क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे फिरोज खान, सैय्यद मोहसिन, वसीम खान व रोशन खान यांनी प्रत्येकी रोख रुपये 1000/- चे बक्षिस प्राप्त केले. स्पर्धेतील सर्व पारितोषिके रोहन बाहेती यांच्यातर्फे देण्यात आली. सागर सोपारकर यांच्या तर्फे कॅरम स्ट्राईकर्स उत्तेजनार्थ म्हणून तीन खेळाडूंना देण्यात आलीत.
प्रमूख पंच म्हणून चंद्रशेखर नर्वरिया, बोर्ड पंच म्हणून सैय्यद युसुफ, वसीम मलिक, शेख अजीज, रईस शाह, वसीम खान, सज्जाद खान, जैद शेख, साकिब अन्सारी, अजहर शेख, अस्लम खान, सैय्यद जुबेर, शेख नाझीम यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी कॅरम असोसिएशन चे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सचिव नितिन बरडे, उपाध्यक्ष रंगनाथ पाटील, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सैय्यद मोहसिन, योगेश धोंगडे, फिरोज खान, नासीर खान, अताऊल्लाह खान, शेख अजीज, मुस्तफा बागवान आदींनी सहकार्य केले.