प्रागतिक विचार मंचतर्फे क्रांतीदिनी भुसावळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : भुसावळ शहर व तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रत्येक शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन प्रागतिक विचार मंचने केले आहे. भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात रविवार, 9 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी एक वाजता या ’गुणगौरव समारंभाचे ’ आयोजन करण्यात आले आहे.

यांची असेल उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष मुख्याध्यापक जे.पी.सपकाळे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून वरणगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे, प्रागतिक चळवळींचे अभ्यासक शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते प्रा.डॉ.जतीन मेढे, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राजेश मानवतकर, जळगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे.
यशवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
या कार्यक्रमात लोकसेवा व राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत तालुक्यातील नेत्रदीपक यश मिळवलेल्या ‘यशवंत विद्यार्थ्यांचा’ विशेष गौरव करण्यात येणार आहे. भुसावळ व वरणगाव नगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्गातून नगरसेवकपदी निवडून आलेल्या नगरसेवक लोकप्रतिनिधींचा देखील प्रागतिक विचार मंचाच्या वतीने सत्कार समारंभ होणार आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची नोंदणी कार्यक्रमस्थळी होणार असून विद्यार्थी व पालकांनी नोंदणीसाठी वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रागतिक विचार मंचाच्यावतीने प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघरत्न सपकाळे यांनी केले आहे.
