भुसावळ तालुक्यात एसआयआर मोहिम : विविध कारणांनी 41 हजार 803 मतदारांची नावे वगळली
96.08 टक्के काम पूर्ण : 316 बीएलओंपैकी 171 जणांनी शंभर टक्के उद्दिष्ट गाठले : दोन लाख 84 हजार 64 मतदारांची पडताळणी
SIR Drive in Bhusawal Taluka: Names of 41,803 Voters Deleted for Various Reasons भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेत भुसावळ तालुक्यातील काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत 96.08 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून मतदार यादीतील त्रृटी दूर करून प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी बीएलओंकडून घरोघरी जाऊन पडताळणी सुरू आहे. भुसावळ तालुक्यात एकूण दोन लाख 84 हजार 64 मतदार असून त्यामध्ये एक लाख 44 हजार 763 पुरुष तर एक लाख 39 हजार 278 महिला आणि 23 इतर मतदारांचा समावेश आहे. भुसावळ तालुक्यात एकूण 316 बीएलओ कार्यरत असून त्यापैकी 171 बीएलओंनी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून सर्वेक्षणादरम्यान 41 हजार 803 मतदारांची नावे विविध कारणांमुळे वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया जोमात
27 हजार 901 विसंगती (अनियमितता) प्रकरणे आढळून आली असून त्यांची पडताळणी व आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. उर्वरित सर्वेक्षणही लवकर पूर्ण करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
माहिती एका नजरेत
एकूण मतदार : 2,84,064
पुरुष मतदार : 1,44,763
महिला मतदार : 1,39,278
इतर मतदार : 23
एकूण बीएलओ : 316
शंभर टक्के काम पूर्ण केलेले बीएलओ : 171
वगळलेली नावे : 41,803
विसंगती (अनियमितता) प्रकरणे : 27,901
एकूण सर्वेक्षण प्रगती : 96.08 टक्के
