‘मिशन राईज’ अंतर्गत भुसावळात विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा : अंमली पदार्थमुक्त जळगावसाठी जनजागृतीचा उपक्रम

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून 10 ऑगस्ट रोजी आयोजन : आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन


भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : जळगाव जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलीस दलाने ‘मिशन राईज’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या उपक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.

‘अमली पदार्थमुक्त जळगावसाठी एकत्र’ (टूगेदर फोर ड्रग फ्री जळगाव) हा या स्पर्धेचा मुख्य विषय असून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण करणे आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचविणे हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.



ही स्पर्धा सोमवार, 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत भुसावळ शहरातील बियाणी मिलिटरी स्कूल, कमल गणपती हॉल आणि तापी पब्लिक स्कूल या तीन केंद्रांवर एकाचवेळी आयोजित करण्यात आली आहे.

या विषयांवर होणार स्पर्धा
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी ‘मिमशन राईज’ च्या चार प्रमुख संकल्पनांवर आधारित पोस्टर तयार करायचे आहेत. त्यामध्ये अंमली पदार्थांना विरोध करा, इतरांना प्रेरित करा, मित्रांना आधार द्या आणि अंमली पदार्थमुक्त समुदाय सक्षम करा या विषयांचा समावेश आहे.

या स्पर्धेत सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नाव व शाळेचे नाव 9822827766 या व्हॉट्सप क्रमांकावर पाठवून नोंदणी करावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अंमली पदार्थमुक्त जळगाव घडविण्याच्या मोहिमेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !