भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये बालगोपाळांची रंगली काव्यवाचन स्पर्धा

50 चिमुकल्यांनी सादर केली हिंदी-इंग्रजी कवितांची मेजवानी


भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालवाडी विभागातील विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीच्या एकूण 50 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांची प्रभावी झलक सादर केली.

स्पर्धेदरम्यान चिमुकल्यांनी हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध विषयांवरील कविता आत्मविश्वासाने सादर केल्या. विद्यार्थ्यांचे स्पष्ट उच्चार, योग्य हावभाव, प्रभावी सादरीकरण आणि मंचावरील सहज वावर पाहून उपस्थित पालक व शिक्षक भारावून गेले. बालगोपाळांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली.



स्पर्धेचे परीक्षण मान्यवर परीक्षकांनी उच्चार, आत्मविश्वास, सादरीकरण, हावभाव आणि विषयानुरूपता या निकषांवर केले. उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रे व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य, आत्मविश्वास, मंचावरील सादरीकरणाची क्षमता तसेच सर्जनशीलतेचा विकास होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.

शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. स्पर्धेच्या निरीक्षक म्हणून मार्था राठोड व कल्पना वारुडकर यांनी जबाबदारी पार पाडली.

याप्रसंगी स्मिता जाधव, चेतना झोपे, क्रिस्तीनिया साबळे, वर्जिनिया बर्नड, सिसिलिया मॅथ्यू, केओना रॉड्रिक्स, स्मिता नन्नवरे, सोनिया दोबाल आणि लिज्जी मोल यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया दोबाल यांनी केले, तर स्मिता जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !