भुसावळ रेल्वे विभागात जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन
भुसावळ (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जागतिक स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट 2026 निमित्त विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ तसेच विविध आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अभियानाचा उद्देश स्तनपानास प्रोत्साहन देणे, माता व बालकांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे तसेच बाल पोषणाबाबत जनजागृती वाढविणे हा होता.
हे अभियान मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवकुमार सी.एरप्पा, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डीएमओ व कुटुंब कल्याण प्रभारी डॉ.रेश्मी जी., यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आले.



या अभियानांतर्गत विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ येथील प्रसूती विभाग, सेंट्रल रेल्वे सेकंडरी ईएम स्कूल, भुसावळ, सेंट्रल इंजिनिअरिंग वर्कशॉप, मनमाड, नांदगाव आरोग्य केंद्र तसेच नाशिक रोड आरोग्य केंद्र येथे विविध जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये डॉ. रेश्मी जी., स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गोरख व्ही. कमलाकर, सुश्री करुणा, वरिष्ठ आहारतज्ज्ञ सुश्री शायजा जमाल, सुश्री ज्योती पाल तसेच इतर वैद्यकीय तज्ज्ञांनी स्तनपानाचे महत्त्व, योग्य स्तनपान तंत्र, माता व बालकांचे पोषण तसेच बालकाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली.
यावेळी योग्य स्तनपान तंत्राचे प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तर सत्र, पॉवरपॉइंट सादरीकरण, शैक्षणिक व्हिडिओ, पोस्टर व बॅनर प्रदर्शन तसेच समूहचर्चा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये एकूण 421 लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मार्गदर्शन व माहितीचा लाभ घेतला.
जागतिक स्तनपान सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाद्वारे मध्य रेल्वे, भुसावळ विभागाने माता व बालकांचे आरोग्य, बाल पोषण तसेच स्तनपानाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
अशा प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम माता व त्यांच्या कुटुंबीयांना स्तनपानाचे महत्त्व, त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच योग्य व व्यावहारिक पद्धतींबाबत माहिती देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.