खडका ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर


भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या ‘आदिशक्ती अभियानात’ उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भुसावळ तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीला मानाचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला. भुसावळ तालुक्यात हा प्रथमच पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य शासनाकडून बहुमान
महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक, शैक्षणिक विकास तसेच आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये ग्रामपंचायत खडके यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या सर्व सर्वसमावेशक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाकडून हा बहुमान घोषित करण्यात आला आहे.





विशेष मार्गदर्शनाखाली मिळाले यश
या यशामध्ये भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.कुलदीप ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आदिशक्ती अभियानाची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच यशोधरा देविदास तायडे, उपसरपंच अर्चना झामसिंग पाटील, ग्रामपंचायत अधिकारी कांचन पंडितराव बादशाह, भुसावळ तालुका समन्वयक सुनील जगन हिवाळे, दीपाली सुनील हिवाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि कर्मचारी वृंदाचे विशेष योगदान लाभले.

विविध संस्थांकडून कौतुकाचा वर्षाव
खडका ग्रामपंचायतीने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल ‘आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर’ च्या अध्यक्षा डॉ.भारती पाटील आणि सहसंचालक रेणू प्रसाद यांच्या वतीने ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्‍यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. खडका ग्रामपंचायतीच्या या गौरवामुळे भुसावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !