यावल शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आली भव्य रॅली

सजीव देखावे ठरले लक्षवेधी : लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग


यावल (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : यावल शहरात मोठ्या उत्साहात रविवारी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने तडवी कॉलनी भागातून दोन, मनुदेवी मंदिरापासून एक तर पंचायत समिती मधून एक अशा चार ठिकाणावरून भव्य वेगवेगळ्या मिरवणुका करण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. रॅलीत आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक सह विविध लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. सजीव देखाव्यासह काढण्यात आलेली मिरवणुका लक्ष वेधणार्‍या ठरल्या होत्या तर रॅलीत सहभागी समाजबांधवांना अल्पोहाराचे वितरण महसूल विभाग तडवी भिल्ल कर्मचारी संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते.

विविध संघटनांचा सहभाग
शहरात रविवारी जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह दिसून आला. यात शहरातील अंकलेश्वर बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मनुदेवी मंदिरापासून आदिवासी टोकरे, ढोर, महादेव, मल्हार कोळी समाज बांधवांची मिरवणूक निघाली होती. तर तडवी कॉलनी भागातून आदिवासी तडवी भिल्ल उत्सव समिती याच भागातून आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच संघटना, आदिवासी सेवा मंडळ आसेम संघटना आणि पंचायत समितीच्या आवारातून आदिवासी विकास परिषद या संघटनांच्या माध्यमातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. तत्पूर्वी आदिवासी थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल सह आदिवासी क्रांतीकारक थोर विभुतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.





रॅलीत यांचा सहभाग
या रॅलीमध्ये आमदार अमोल जावळे, नगराध्यक्ष छायाताई पाटील, प्रकल्प अधिकारी अरूण पवार, नगरसेवक अतुल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती पांडुरंग सराफ, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील, नगर पालिकेच्या भाजपा गट नेता नंदाताई महाजन, नगरसेविका सविता नन्नवरे, नगरसेवक रुबाब तडवी, पराग सराफ, योगेश चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष सागर कोळी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सोनवणे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, मीना तडवी, सह शहरातील नगरसेवक, विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते तर शहरातून राष्ट्रीय महामार्गावरून भव्य मिरवणुका करण्यात आल्या, काही मिरवणुका बोरावल गेट जवळील धनश्री मंगल कार्यालय तर काही मिरवणूक एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय तर काही मिरवणुका सुमंगल कार्यालयात नेऊन त्यांचा समारोप करण्यात आला.

या संपूर्ण मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात याकरिता डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन सह पोलीस आणि होमगार्ड पथकाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !