भुसावळच्या रोमीता बुंदेला यांची राष्ट्रीय भरारी : ‘सागर में सम्मान’ कार्यदलात निवड

देशातील पहिल्या महिला विद्युत-तांत्रिक अधिकार्‍याचा केंद्राकडून गौरव


भुसावळ (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : भारतीय सागरी क्षेत्रात तांत्रिक कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणार्‍या भुसावळच्या रोमीता बुंदेला यांनी आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत समुद्रीय प्रशासन महासंचालनालयाच्या ‘सागर में सम्मान’च्या दुसर्‍या टप्प्यातील कार्यदलात त्यांची निवड झाली आहे. महिलांची सुरक्षितता, सन्मान, समान संधी आणि करिअर प्रगतीसाठी त्या राष्ट्रीय स्तरावर योगदान देणार आहेत.

महिला कर्मचार्‍याचा गौरव
केंद्र सरकारच्या ‘सागर में सम्मान’ पाच वर्षांच्या कृती आराखड्यात रोमीता यांचा ‘देशातील पहिल्या महिला विद्युत-तांत्रिक अधिकारी’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. देशातील निवडक दहा प्रेरणादायी महिला सागरी व्यावसायिकांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
2017 मध्ये त्यांनी तोलानी सागरी संस्थेत विद्युत-तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण घेताना संस्थेच्या पहिल्या महिला प्रशिक्षणार्थी अधिकार्‍याचा मान मिळवला. त्यानंतर मर्स्क कंपनीच्या जहाजावर महिला विद्युत-तांत्रिक अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली. पुढे विद्युत अधीक्षक म्हणून अवघ्या 26व्या वर्षी 64 जहाजांना विद्युत तांत्रिक सहाय्य देण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली.





कोरोना महामारीच्या काळातही नऊ महिन्यांहून अधिक काळ जहाजावर राहून त्यांनी सेवा बजावली. भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून त्यांनी विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. वडील सुधीर बुंदेला यांच्या पाठबळामुळे त्यांनी सागरी क्षेत्राची वाट निवडली.

महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मितीचे ध्येय
आता कार्यदलाच्या माध्यमातून महिला नाविकांसाठी सुरक्षित व सन्मानजनक वातावरण, समान संधी, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि नेतृत्वाच्या संधी वाढविण्यासाठी रोमीता काम करणार आहेत. भुसावळमधील विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीपासून देशातील पहिल्या महिला विद्युत-तांत्रिक अधिकार्‍यापर्यंतचा त्यांचा प्रवास शहरातील तरुणींसाठी प्रेरणादायी ठरला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !