भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त मार्गदर्शन
भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : ग्रंथालय शास्त्राचे जनक, महान ग्रंथपाल व शिक्षणतज्ज्ञ डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. राजू फालक यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.
डॉ. रंगनाथन यांनी भारतातील ग्रंथालय चळवळीला नवी दिशा देत ग्रंथालय शास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी मांडलेली ग्रंथालय शास्त्राची पाच सूत्रे आजही ग्रंथालय सेवेसाठी मार्गदर्शक ठरतात. ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार असून त्याचा अधिकाधिक उपयोग विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे सांगण्यात आले.





आजच्या डिजिटल युगात मोबाईल व सोशल मीडियामुळे पुस्तक वाचनाची सवय कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज किमान 20 ते 30 मिनिटे वाचनासाठी वेळ द्यावा. कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, साहित्य तसेच वर्तमान घडामोडींवरील पुस्तके वाचावीत. वाचलेल्या पुस्तकातील महत्त्वाचे विचार नोंदवून त्यावर मित्रांमध्ये चर्चा करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयातील ग्रंथालयाचा नियमित वापर करावा तसेच पुस्तक परिचय, वाचन कट्टा, वाचन स्पर्धा यांसारखे उपक्रम राबवून वाचनाची आवड वाढवावी. ई-बुक्स, ऑनलाइन ग्रंथालये आणि डिजिटल शैक्षणिक साहित्याचा सकारात्मक वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा विस्तार करावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जयश्री भंगाळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.सागर सोनावणे, प्रा.अजय साळुंखे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.