यावल शहरातील सरस्वती विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात
यावल (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : शहरातील सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साह व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक बी.सी. ठाकूर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सराफ, संचालक जी.डी.कुलकर्णी, एन.डी.भारुडे, दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नरेंद्र महाले यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध संचलन (परेड) सादर केले. विद्यार्थ्यांनी एस.बी.चंदनकार यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतमय कवायतीचे उत्तम सादरीकरण करून उपस्थितीची दाद मिळवली.




देशभक्तीपर स्पर्धांचे आयोजन
स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयात विविध देशभक्तीपर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण व नृत्य स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात शिक्षकांनीही राष्ट्रभक्तीपर समूहगीत सादर करून कार्यक्रमात रंगत भरली. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी तंबाखू मुक्तीसह कॉपी मुक्तीच्या संदर्भात सामूहिक शपथ देखील घेण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगत देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन बी.पी.वैद्य यांनी तर आभार अमोल शिंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.