भुसावळ एस.टी.आगारात स्वातंत्र्य दिन उत्साहात
गुणवंत विद्यार्थी व कर्तव्यनिष्ठ चालकांचा गौरव
भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भुसावळ आगारात तसेच बस स्थानकावर 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भुसावळ आगारात आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांच्याहस्ते तर बस स्थानकावर वाहतूक निरीक्षक जयेश लोहार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
गुणवंत पाल्यांचा सत्कार
यावेळी एसटी कर्मचार्यांच्या पाल्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविल्याबद्दल त्यांचा स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.




वर्षभरात 260 दिवस सेवा बजावताना विना अपघात कर्तव्य पार पाडणार्या कर्तव्यनिष्ठ चालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. अशा चालकांना प्रत्येकी दिड हजार रुपये रोख बक्षीस देऊन त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र गीत, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने संपूर्ण आगार परिसर दुमदुमून गेला. देशभक्तिपर गीतांमुळे वातावरणात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक रांगोळ्या काढून आगार परिसर सुशोभित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास आगारातील बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि कर्तव्यनिष्ठ एसटी कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला.