भुसावळ रेल्वे विभागात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ येथील विभागीय रेल्वे कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले.
संदेशाचे केले वाचन
ध्वजारोहणानंतर पुनीत अग्रवाल यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक (मुंबई) यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्तचा संदेश वाचून दाखविला. या संदेशामध्ये जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीत मध्य रेल्वेने केलेल्या विविध उल्लेखनीय कामगिरीची आणि कार्यांची माहिती देण्यात आली.




यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीय तसेच रेल्वे ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रेल्वे सुरक्षा बलाच्या तुकडीने ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान मानवंदना देत शानदार परेड सादर केली. यामध्ये स्काउट-गाईड, सिव्हिल डिफेन्स तसेच रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नृत्य सादर केले. तसेच सांस्कृतिक अकादमीतील रेल्वे कर्मचार्यांनी सुंदर देशभक्तिपर गीते सादर करून कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमादरम्यान, महाप्रबंधकांच्या निरीक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विभागीय रेल्वे रुग्णालय, अभियांत्रिकी, विद्युत, भंडार विभाग आणि ताप्ती क्लब यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचा उत्सव भुसावळ विभागातील सर्व स्थानके, कार्यशाळा आणि विविध डेपो येथेही उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना, भुसावळच्या अध्यक्षा श्रीमती रेखा अग्रवाल आणि इतर कार्यकारिणी सदस्या, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम.के.मीना, विविध विभागांचे वरिष्ठ शाखाधिकारी, रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.