राजस्थानच्या सायबर ठगांविरोधात जळगावात गुन्हा : देशभरातील 11 नागरिकांना सव्वादोन कोटीत गंडवले


जळगाव (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : राजस्थानच्या महाठगांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या नावे शहरातील विविध बँकांमध्ये सात खाते उघडत तब्बल दोन कोटी 15 लाख 39 हजार 230 रुपयांची सायबर फसवणूक केली. सायबर पोलिसांच्या तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर ही खाते गोठवण्यात आली असून दोन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केली तक्रार
पोलीस कर्मचारी प्रमोद फकीरा वाडीले (40, नवीन बिल्डिंग, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून करण सांखला उर्फ सैनी, रा. रायसोनी नगर, जळगाव, मूळ रा.मेढता सिटी माळीओ का मोहल्ला, नागौर, राजस्थान आणि त्याचा साथीदार टोनी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दीड वर्षाच्या कालावधीत रक्कम हडप
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, 9 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून विविध व्यक्तींच्या नावाने जळगावात सात बँक खाती उघडली. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आला. जळगाव पीपल्स बँकेच्या खात्यात 9 जुलै 2024 ते 7 मार्च 2025 या कालावधीत तब्बल दोन कोटी 14 लाख 72 हजार 989 रुपये तर जळगाव जनता बँकेच्या खात्यात 29 जुलै 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत 66 हजार 241 रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. अशा प्रकारे एकूण दोन कोटी 15 लाख 39 हजार 230 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे समोर आले.

या बँकांमध्ये वळवली फसवणुकीची रक्कम
आरोपींनी सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव पीपल्स बँक आणि जळगाव जनता बँक यांसह विविध बँकांमध्ये एकूण सात खाती उघडून सायबर फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली. या बँक खात्यांविरोधात देशभरातून सायबर फसवणुकीच्या 11 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी कटकारस्थान रचून बँक खाती उपलब्ध करून घेत इतरांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !