नंदुरबार शहर पोलिसांची गाजा व अवैध दारूविरोधात मोठी कारवाई : दोन लाख 59 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त
नंदुरबार (शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026) : नंदुरबार शहर पोलिसांनी अंमली पदार्थ व अवैध दारूविक्रीविरोधात मोठी कारवाई करत कंजरवाडा परिसरातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत पाच किलो सुका गांजा, 82 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि बिअरच्या बाटल्या असा एकूण दोन लाख 59 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील कंजरवाडा परिसरात गांजा व अवैध दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.




या कारवाईत कंजरवाड्यातील ईश्वर शिवधन गमने (36, कंजरवाडा, नंदुरबार) यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी घरातून पाच किलो सुका गांजा, 82 लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच बिअरच्या बाटल्या असा दोन लाख 59 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण मराठे यांच्यासह पोलीस कर्मचारी जगदीश पाटील, प्रशांत पाटील, नरेंद्र चौधरी, जितेंद्र सोनवणे, राजेंद्र धनगर, गणेश नाईक, ललित गवळी, रूपेश पगारे, राहुल राठोड, अमित भरवाड, राजेंद्र काटके, नरेंद्र पाडवी, आनंद मराठे, निंबाबाई वाघमोडे आदींनी केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
नंदुरबार जिल्ह्यात गांजा, अमंली पदार्थ, गावठी हातभट्टीची दारू अथवा इतर कोणतेही बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी ती तात्काळ संबंधित पोलिस ठाण्याला कळवावी. माहिती देणार्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

