नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : चिनोदा गावातून तीन लाखांचा गुटखा जप्त

कारवारईने अवैध विक्रेते धास्तावले : गुजरात राज्यातून चोरट्या मार्गाने वाहतूक होताना कारवाई


तळोदा (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पानमसाला व तंबाखूची गुजरात राज्यातून तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत दोन लाख 94 हजार 248 रुपये किंमतीचा प्रतिबंधित विमल पानमसाला व तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले पाच लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण सात लाख 94 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे पथकाची कारवाई
बुधवार, 2 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातून तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील चिनोदा गावात चोरीच्या मार्गाने येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाने कारवाईचे आदेश दिले.


2.94 लाखांचा गुटखा ; पाच लाखांचे वाहन जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील चिनोदा गावात छापा टाकला. या कारवाईत कल्पेश संजय मराठे (34, रा.चिनोदा, ता.तळोदा) याच्या ताब्यातून दोन लाख 94 हजार 248 रुपये किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला व तंबाखू जप्त केली. गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले पाच लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. गुटखा व वाहन मिळून एकूण सात लाख 94 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, दादाभाऊ वाघ, ईश्वर पाटील, मोहन ढमहरे, तसेच पोलीस अंमलदार निशिगंध गवळे, सचिन सैंदाणे आदींच्या पथकाने केली. या कारवाईमुळे तळोदा परिसरातून प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !