शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद !
685 महिला गोविंदांचा कसून सराव ; 15 संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी प्रवेश विनामूल्य 63 हजारांची रोख पारितोषिके अन् 10 लाखांचा अपघाती विमा
जळगाव (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : नारीशक्तीचा साहसी आविष्कार, युवतींच्या धाडसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अनुभवण्याची संधी जळगावकरांना शनिवारी, 5 सप्टेंबर रोजी मिळणार आहे. भंवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आयोजित ‘युवतींची दहीहंडी 2026’ हा भव्य सोहळा सायंकाळी 6 ते रात्री 9.30 या वेळेत शिवतीर्थ मैदान (जी.एस. ग्राउंड) येथे रंगणार आहे. या सोहळ्यासाठी 15 महिला गोविंदा पथकांमधील तब्बल 685 युवतींचा कसून सराव सुरू असून, त्यांच्या मानवी मनोर्यांचा थरार पाहण्याची उत्सुकता जळगावकरांमध्ये निर्माण झाली आहे.
10 लाख रुपयांचा अपघाती विमा
या दहीहंडी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सहभागी होणार्या युवतींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक महिला गोविंदाचा 10 लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे. दहीहंडीचा हा उत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील युवतींनी, कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नारीशक्तीच्या या धाडसी उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.

15 संघ, 685 महिला गोविंदा
किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर.आर. इंग्लिश मीडियम स्कूल, उडाण फाऊंडेशन, केसीई मुलींचे वसतिगृह, अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, एल.एच. पाटील पब्लिक स्कूल आणि हरिजन कन्या छात्रालय आदी शाळा-महाविद्यालयांमधील 15 संघ सहभागी होत आहेत. या संघांमधून तब्बल 685 महिला गोविंदा युवती सहभागी होणार असून, त्यांच्या साहसी मानवी मनोर्यांचा थरार शिवतीर्थावर अनुभवता येणार आहे.
स्पर्धा नव्हे, उत्सव; सर्वांना समान संधी
दहीहंडीच्या माध्यमातून साहसासोबतच समता आणि समान संधीचा संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. हा केवळ स्पर्धेचा कार्यक्रम नसून उत्सव आहे, हे अधोरेखित करण्यासाठी सहभागी होणार्या सर्व 15 संघांना दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी मैदानावर 15 दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.
युवतींसाठी 63 हजारांची रोख पारितोषिके
मागील वर्षीच्या दहीहंडीच्या समारोपावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी युवतींसाठी रोख पारितोषिके देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची यंदा पूर्तता करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या संघाला 31 हजार 111 रुपये, द्वितीय क्रमांकाला 21 हजार 111 रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला 11 हजार 111 रुपये, अशी एकूण 63 हजार 333 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणार्या युवतींचाही विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून, सहभागी सर्व संघांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
213 ढोलवादकांचा दणदणाट; लेझर शो अन् आतषबाजी
युवतींच्या दहीहंडीचा थरार वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक आणि साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांमधील तब्बल 213 ढोलवादक आपल्या दमदार वादनाने वातावरण दणाणून सोडणार आहेत. मर्दानी खेळ, चिमुकल्यांसाठी सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. शहरातील 15 रिल्स स्टार युवतींचाही या उत्सवात सहभाग राहणार असून, त्यामुळे तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. चिमुकल्यांसाठी मल्लखांबासह विविध साहसी खेळांचे प्रदर्शनही या वेळी पाहायला मिळणार आहे.
नारीशक्तीच्या सामर्थ्याचा जागर करणार्या या अनोख्या सोहळ्यास जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

