पारोळा तालुक्यातील भूमिपूत्राला शासकीय इतमामात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटुंबीयांचे केले सांत्वन : शहीद जवान अमर रहेच्या घोषणांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची श्रद्धांजली


जळगाव (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : पारोळा तालुक्यातील कोळपिंप्रीचे भूमिपुत्र वीर जवान लान्स नायक रोहित नारायण पाटील यांच्या पार्थिवावर शुक्रवारी कोळपिंप्री येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी शहीद जवानाला मानवंदना देत अखेरची सलामी दिली.

युद्धाभ्यासादरम्यान वीरमरण
भारतीय सैन्य दलातील 1 पॅरा (स्पेशल फोर्सेस) युनिटमध्ये कार्यरत असलेले सैनिक क्रमांक 21010294द लान्स नायक रोहित नारायण पाटील यांना 1 सप्टेंबर 2026 रोजी हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील हथिनी कुंड बॅरेज परिसरात सैन्याच्या प्रत्यक्ष मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या युद्धाभ्यासादरम्यान वीरमरण आले. लान्स नायक रोहित पाटील हे चिनूक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरू असलेल्या डायव्हिंग व हेलोकास्टिंग सरावात सहभागी झाले होते. पाण्याखालील डायव्हिंग व हेलोकास्टिंग प्रशिक्षणादरम्यान त्यांना वीरमरण आले.


अंत्यदर्शनार्थ गर्दी
शहीद लान्स नायक रोहित पाटील यांचे पार्थिव शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता लष्करी वाहनातून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कोळपिंप्री, ता. पारोळा, जि. जळगाव येथे आणण्यात आले. पार्थिव गावात दाखल होताच कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अमर रहे, अमर रहे शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या.

पालकमंत्र्यांची भेट
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहीद वीर जवान लान्स नायक रोहित पाटील यांच्या पार्थिवावर पुष्प चक्र अर्पण केले, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुष्प चक्र अर्पण केले. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी शहीद जवान यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान शहीद लान्स नायक रोहित पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पारोळा पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली तसेच भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देत शाहिद वीर जवानाला अखेरची सलामी दिली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील,पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, सैनिक कल्याण संघटक विश्वनाथ उगले, परिसरातील, स्थानिक लोकप्रतिनिधी,जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, एन. सी सी,सैनिक शाळेचे विध्यार्थी,ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारोळा तालुक्यावर शोककळा
शहीद लान्स नायक रोहित पाटील यांच्या बलिदानाने कोळपिंप्रीसह संपूर्ण पारोळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणार्‍या या वीर जवानाच्या शौर्याला आणि त्यागाला जिल्हावासीयांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !