भुसावळसह नशिराबादचा संशयीत ठाण्यासह येरवडा कारागृहात स्थानबद्ध
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत नशिराबाद आणि भुसावळ तालुका परिसरातील दोन सराईत गुन्हेगारांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नशिराबाद शहरातील शोएब शेख गुलाम नबी उर्फ शोएब बिल्डर (35, रा.ख्वाजा नगर, नशिराबाद) व भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सम्राटकुमार सुरेश बनसोडे (37, रा. आंबेडकर नगर परिसर, भुसावळ) अशी स्थानबद्ध झालेल्यांची नावे आहेत.

नशिराबादच्या शोएब बिल्डरविरोधात सात गंभीर गुन्ह्यांची नोंद
पोलिसांच्या माहितीनुसार, 2021 ते 2026 या कालावधीत शोएब बिल्डरविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात सात गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, रस्ता अडवणे, गर्दी जमवणे, साधी दुखापत करणे, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही आरोपीच्या वर्तुणात सुधारणा होत नसल्याने नशिराबादच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे यांनी 30 जून 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आरोपीविरोधात एमपीडीएचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर छाननी झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर संशयीताला स्थानबद्ध करण्याचे आदेश 4 सप्टेंबरला पारीत करण्यात आल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी केली.
भुसावळातील संशयीतही स्थानबद्ध
भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सम्राटकुमार सुरेश बनसोडे (37, रा.आगवाली चाळ, क्वॉर्टर क्रमांक 271 समोर, भुसावळ) याच्याविरुद्धही विविध स्वरूपाचे पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे शहर व तालुका पोलिसात दाखल आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी व मारामारीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. भुसावळ तालुका पोलिसांनी प्रस्ताव तयार करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला व छाननीनंतर तो 6 जुलै रोजी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला. 4 रोजी संशयीताला ठाणे कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
ठाणे कारागृहात संशयीत स्थानबद्ध
संशयीत सम्राटकुमार सुरेश बनसोडे यास भुसावळ तालुक्याचे परिवेक्षाधीन पोलीस उपधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, बाजारपेठचे सहा.निरीक्षक राजेंद्र चाटे, एएसआय संजय तायडे, हवालदार योगेश पालवे, मनोज येऊलकर, जितेंद्र सुरवाडे, जगदीश भोई, कांतीलाल कोळी, योगेश माळी, भूषण चौधरी, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आदींनी संशयीताला येरवडा, ठाणे कारागृहात स्थानबद्ध केले.
आगामी काळात गुन्हेगारांवर होणार कारवाई
आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण करणार्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई सुरूच राहील, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले.

