फुलगावातील कोळसा चोरट्यांची टोळी भुसावळ तालुका पोलिसांच्या जाळ्यात

ट्रॅक्टर-ट्रॉलीसह पाच टन कोळसा जप्त ; दोन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त


भुसावळ (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील ओव्हर ब्रिज रेल्वे ट्रॅकवरून कोळसा चोरी करून ट्रॅक्टरमध्ये नेणार्‍या फुलगाव, ता.भुसावळ येथे आठ चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात भुसावळ तालुका पोलिसांना यश आले आहे. आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर-ट्रॉली आणि सुमारे पाच टन कोळसा असा एकूण 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोळसा चोरी करताना पकडले
1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे सात वाजता दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील रेल्वे ओव्हरब्रिजजवळ 7 ते 8 इसम रेल्वे ट्रॅकवरील कोळसा चोरी करून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याची माहिती कळताच सुरक्षा अधिकारी मधुकर जाधव यांच्यासह संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा रक्षकांना काही जण कोळसा चोरी करून ट्रॅक्टरमध्ये भरताना आढळले व त्यांना हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला असता दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पळ काढला.

गुन्हा दाखल होताच पडल्या बेड्या
भुसावळ तालुका पोलिसांनी शेखर चंद्रकांत बाविस्कर, धीरज संजय सोनवणे, मुकेश अरुण सोनवणे, जितेंद्र संजय शिंदे, मोहित किरण पाटील, विजय जगदीश पावरी (रा.फुलगाव, ता.भुसावळ) यांची ओळख पटवत त्यांना अटक केली तर आरोपींच्या चौकशीतून पसार झालेले संशयीत रोहित किरण सोनवणे व सागर रवींद्र कोळी (दोन्ही रा.फुलगाव, ता.भुसावळ) असल्याचे निष्पन्न होताच त्यांनाही अटक करण्यात आली.

पाच टन कोळसा आणि वाहन जप्त
पोलिसांनी आठही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत पोलीस कोठडी मिळाली. तपासात गुन्ह्यात वापरण्यात आलेले ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे तसेच चोरीचा पाच टन कोळसा सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा असा एकूण दोन लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुक्याचे परिवेक्षाधीन उपअधीक्षक प्रशांत डेरेकर, सहाय्यक फौजदार संजय तायडे, हवालदार योगेश पालवे, हेमंत मिटकरी, जितेंद्र ठाकरे, किरण तायडे, मुकेश मेढे, सुभाष सोनवणे हवालदार कैलास बाविस्कर आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !