जुन्या पेन्शनसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर काळे मास्क बांधून मूक मोर्चा
आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कारचा इशारा : इच्छा मरणाची परवानगीची मागणी
जळगाव (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व तदनंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी 1982 प्रमाणे जुनी पेन्शन मिळण्यासाठी तोंडावर काळे मास्क लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. सुमारे सातशे शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
विधानसभेत घोषणा मात्र अंमलबाजवणी नाही
2005 नंतर नियुक्त कर्मचार्यांना पेन्शन बंद चा निर्णय शासनाने 2010 मध्ये जाहीर केला मात्र यात 2005 पूर्वी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित कर्मचार्यांना देखील पेन्शन नाकारले तर 2005 पूर्वी जाहिरात असताना 2005 नंतर नियुक्त कर्मचार्यांना पेन्शन देण्यात आले नैसर्गिक न्यायतत्वानुसार हा अन्याय असल्याने जिल्हयातील सुमारे 700 कर्मचार्यांनी माध्यमिक पतपेढी पासून मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. त्याठिकाणी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व विधानसभेत घोषणा करून देखील अमलबाजवणी नाही.
काय आहेत मागण्या ?
निवेदनात म्हटले आहे की, 25 सप्टेंबर 2026 पर्यंत शासनाने 1982 प्रमाणे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करावेत अन्यथा 28 सप्टेंबर 2026 पासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. पुढच्या 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून आमरण उपोषण करण्यात येईल, आगामी येणार्या निवडणूकांवर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर विद्यार्थी, पालक, कुटुंब मतदानावर बहिष्कार टाकू, पेन्शन देत नसाल तर राज्यातील 26 हजार कर्मचार्यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
राज्य समन्वयक शिक्षक नेते संभाजी पाटील, डॉ.शांताराम पाटील , जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, विनाअनुदानीत संघटनेचे नाना पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे रवींद्र पाटील, ललितकुमार चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे रवींद्र पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे विद्या सचिव प्रकाश पाटील, अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास पाटील, ईश्वर महाजन, अशोक सूर्यवंशी, महिला संघटनेच्या सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील, प्रवीण पाटील, मुख्याध्यपक संघटनेचे तालुकाध्यक्ष जे.के.पाटील, सचिन पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

