दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमळनेर प्रांताधिकार्यांना निवेदन
अमळनेर (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : जळगाव जिल्हा तसेच अमळनेर तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांना तातडीने द्यावी आर्थिक मदत
दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याला शासनाने मदत करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यात प्रामुख्याने दुष्काळग्रस्त शेतकर्यांना प्रति हेक्टरी एक लाख नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, नियमित कर्जदार शेतकर्यांना दोन लाखांचे विशेष अनुदान तातडीने देण्यात यावे, सन 2024 व 2025 मधील प्रलंबित पीक विम्याची रक्कम तत्काळ शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी तसेच 2026 चा पीक विमाही नियमानुसार तातडीने अदा करण्यात यावा, पात्र शेतकर्यांना कोणत्याही अडथळ्याविना नवीन पीक कर्ज तत्काळ उपलब्ध करून द्यावे, सन 2019 पूर्वीचे प्रलंबित पीककर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासह अन्य प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, ईश्वर पाटील, भूषण कोळी, प्रदीप पाटील, दत्तात्रय पाटील, योगेश कोळी, विश्वास पाटील, संदीप सौंदाणे, अरुण पाटील, अमजद खा पठाण, गणेश पाटील, आकाश पाटील आदी उपस्थित होते.
