टाकरखेड्यात सायबर योद्ध्यांचा उपक्रम : नागरिकांना मोबाईल सुरक्षिततेचे मार्गदर्शन
एरंडोल (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने टाकरखेडा, ता.एरंडोल, जि.जळगाव येथे ‘सायबर शिक्षित गाव’ हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या मोबाईल वापराबाबत माहिती घेण्यासोबतच मोबाईलमधील सुरक्षा व्यवस्था व गोपनीयतेची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
क्विक हील फाउंडेशन, पुणे आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील सायबर योद्धा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षण, सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना सायबर गुन्हे, सुरक्षित डिजिटल व्यवहार, मोबाईलचा योग्य वापर आणि वैयक्तिक डिजिटल माहितीचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
डिजिटल सुरक्षेशी संबंधित विविध बाबींचा आढावा
उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत गावातील नागरिकांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. सायबर योद्धे आणि स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या मोबाईल वापराबाबत माहिती घेतली. मोबाईलमधील सुरक्षा व्यवस्था, वापराच्या पद्धती तसेच डिजिटल सुरक्षेशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
गोपनीयतेशी संबंधित बाबींचा आढावा
यानंतर 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोबाईलमधील माहिती गळती तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नागरिकांच्या मोबाईलची तपासणी करून माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयतेशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला. आवश्यक सुरक्षा व्यवस्था करून देण्यात आल्या. तसेच अनावश्यक माहितीची देवाणघेवाण, परवानग्या आणि गोपनीयतेशी संबंधित संभाव्य धोके कमी करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर योद्धा मंडळाचे 20 सायबर योद्धे तसेच संगणक विज्ञान शाखेतील इच्छुक स्वयंसेवक सहभागी झाले. शिक्षक समन्वयक राजू आमले सर आणि टाकरखेडा गावचे सरपंच श्री. प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.
जागरूकता निर्माण करण्यास मदत
नागरिकांशी थेट संवाद साधत घराघरात पोहोचणे, त्यांच्या डिजिटल वापराबाबत माहिती जाणून घेणे आणि त्यानंतर मोबाईलच्या सुरक्षेची प्रत्यक्ष तपासणी करणे, अशा पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मोबाईल सुरक्षितता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.
