‘उजेड पेरणारी माणसं’चे बुधवारी राज्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे यांची असेल उपस्थिती


 

जळगाव (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने भुसावळ येथील आनंदा पाटील यांच्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या ललित व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बुधवार, 7 रोजी जळगावात होत आहे.

यांची असेल उपस्थिती
जळगावातील डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथील मराठी भाषा विभाग आणि प्रगतिशील लेखक संघ उत्तर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता बेंडाळे महाविद्यालयातील धांडे सभागृहात हा कार्यक्रम होईल. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे असतील. प्रमुख अतिथी म्हणून अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे उपस्थित राहतील. तसेच प्रगतिशील लेखक संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक डॉ. मिलिंद बागूल आणि उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांची विशेष उपस्थिती असेल. जळगावसह जिल्हाभरातील साहित्यिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा.दीपक पवार, बापूराव पानपाटील, प्रा.मेघा बारी, राजेंद्र पारे, प्रा.निकिता सोनवणे व ज्योती वाघ यांनी केले आहे.

अंधारातील दीपस्तंभ उजेडात…
‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकात वामनदादा कर्डक यांचा वैचारिक वारसा चालवणारे भीमशाहीर प्रतापसिंगदादा बोदडे, आंबेडकरी चळवळ समृद्ध करणारे दिलीप घोडेस्वार, देश-विदेशातील ज्येष्ठांच्या स्पर्धा गाजवणारे धावपटू आर. बी. भवार, आंतरराष्ट्रीय चित्रकार पिसूर्वो आणि साहित्यशास्त्री तेजपाल चौधरी यांच्यासह खान्देशातील 84 दीपस्तंभांचा धांडोळा घेण्यात आला आहे.

पुस्तक पोहोचले देश-विदेशात…
पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या वेगळ्या धाटणीच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या 28 दिवसांत संपली. त्यानंतर या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी होत आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक व परदेशातही हे पुस्तक पोहोचले आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या पुस्तकाच्या सामूहिक रसग्रहणाचे कार्यक्रमही सातत्याने होत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !