‘जिवंत स्त्री’ची अब्रू लुटली जात असताना तेव्हा का तुमचे रक्त उसळत नाही ? अमळनेरात कवयित्री गुंजन पाटील
अमळनेर (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : तुम्ही सार्यांनी महापुरुष वाटून घेतले आहेत. पुतळ्याची विटंबना होते तेव्हा तुमचे रक्त उसळते मात्र जिवंत स्त्री ची अब्रू लुटली जाते तेव्हा तुमचे रक्त का उसळत नाही ? असा खोचक सवाल सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील हिने अमळनेर येथील काव्य संध्या मैफिलित केला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवार, 4 रोजी पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील व नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील यांनी काव्य मैफिलीचे आयोजन केले होते.
तोकड्या कपड्यातील महिलांच्या जाहिरातीवर टीका
गुंजन पाटील हिने आपल्या विनोदी आणि प्रेम कवितांकडून प्रबोधनात्मक कवितांकडे जाताना शेतकरी विषयावर मी शेतकर्याची पोर, माझ्या बापाचा हिशोब मागते, स्त्री जाणीव आणि स्त्री समानतेवर तिने महाराष्ट्राचा युपी-बिहार का होत आहे, गरीब सीता, डोरलं, मला आई व्हायचं नाही यासह अनेक कविता सादर केल्या. यावेळी त्यांनी शासनाची हमी भावाची धोरणे, कंपन्यांच्या जाहिरातींवर महिलांना कमी कपड्यात दाखवणे यावर खरमरीत टीका केली.
मनाला भावणार्या कविता
उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, गुंजन पाटील हिच्या कविता मनाला भावणार्या आहेत, त्या समाजाला दिशा देणार्या आहेत. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी उपस्थित प्रेक्षकांना पोलीस बंदोबस्त विना सण आणि उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी स्वतः तसेच विक्रांत पाटील, गुंजन पाटील व जयश्री पाटील यांच्याकडून दुष्काळ निधीसाठी 50 हजार रुपये जाहीर केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ.भाग्यश्री वानखेडे लिखित ‘एक सावित्री’ या कविता संग्रह आणि मीराबाई साळी लिखित ‘निरार्थ’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गणेशोत्सव मिरवणुका वेळेत पार पाडल्याबद्दल पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस कुटुंब म्हणून पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांचा कुटुंबासह, आरोग्य निरीक्षक संतोष माणिक यांचा कर्मचार्यांसह विद्युत अभियंता हेमंत सैंदाणे, होमगार्ड कैलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून आफअनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परीक्षीत बाविस्कर, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, खान्देश शिक्षण मंडळ चेअरमन निरज अग्रवाल, म.वा.मंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, लायन्स क्लब अध्यक्ष जितेंद्र पारख, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील, कवी शरद धनगर, नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील हजर होते. कवी धनगर यांच्या अहिराणी कवितेने प्रेक्षक हसून हसून लोट पोट झाले. प्रास्ताविक आयोजक सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील यांनी तर सूत्रसंचालन तर आभार संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरूण पाटील, विजय राजपूत, सुनील भोई, भूषण महाजन, मॉन्टी साळी यांनी सहकार्य केले.


