‘मैत्रेय ग्रुप’ फसवणूक प्रकरणातील सर्व गुन्हे एकत्रीत करणार ! : 10 रोजी एजंटांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन


जळगाव (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित गुन्ह्याच्या तपासाला आर्थिक गुन्हे शाखेकडून वेग देण्यात आला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/2016 अन्वये भादंवि कलम 420, 406, 34 तसेच ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

10 रोजी एजंट-प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन
या गुन्ह्याचा पुढील तपास महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीसी कलम 173(8) अन्वये सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधी व एजंटांना आर्थिक गुन्हे शाखेने एजंटांकडे उपलब्ध असलेली गुंतवणूकदारांची माहिती, संबंधित कागदपत्रे व इतर पुरावे घेऊन आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव कार्यालयात 10 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

209 कोटी रुपयांची फसवणूक
पोलिसांच्या माहितीनुसार, मैत्रेय ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या व्यक्तींची संख्या जिल्ह्यात सुमारे दोन लाख 32 हजार आहे तर अंदाजे 209 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी गुंतवणूकदारांकडून उपलब्ध होणारी कागदपत्रे व माहिती महत्त्वाची ठरणार असून, आर्थिक व्यवहारांशी संबंधित पुरावे पोलिसांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मैत्रेय ग्रुप फसवणूक प्रकरणातील संबंधित सर्व गुन्हे एकत्रीत करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !