जळगाव जिल्ह्यातील दाम्पत्याने सावळदेतील तापी पात्रात उडी घेत उचलले टोकाचे पाऊल

आत्महत्येपूर्वी पायाला बांधली साखळी : नरडाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद


अमळनेर (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी असलेल्या व हल्ली उत्राण, ता.एरंडोलस्थित जोडप्याने तापी नदीत एकाचवेळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. श्याम हरी पाटील (28, मूळ रा.पाडळसरे, ता.अमळनेर, हल्ली मुक्काम उत्राण, ता.एरंडोल) व पत्नी सपना (20) अशी मृतांची नावे आहे. ही घटना गुरुवारी, 8 रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास नरडाणा, ता.शिंदखेडा शिवारातील सावळदे पुलावर घडली.

‘एक दुजे के लिए चित्रपटाची’ आठवण
मयत दाम्पत्याने प्र्रेम विवाह केला होता व अखेरच्या क्षणीही त्यांनी सोबत राहण्याचा निर्धार करीत मृत्यूपूर्वी दोघांच्या पायाला साखळी बांधून कुलूपही लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुलावर लावलेल्या दुचाकीनंतर संशय बळावला व खातरजमा केल्यानंतर गुरुवारी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. नरडाणा पोलिसांना माहिती मिळताच सहा.निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्‍यांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून या प्रकरणी नरडाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दाम्पत्याने आत्महत्या का केली? याबाबत स्पष्ट कारण कळू शकले नाही. तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आव्हाळे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !