सेवा संकल्प अभियानांतर्गत एरंडोल शहरात लाभार्थींना विविध दाखल्यांचे वाटप
एरंडोल तहसीलदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम ; लाभार्थींमधून समाधान
एरंडोल (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : सेवा संकल्प अभियानांतर्गत एरंडोल तहसील कार्यालयाच्या वतीने गुरुवारी शहर तलाठी कार्यालयात लाभार्थींना विविध शासकीय दाखले व महसूल विभागाशी संबंधित कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. एरंडोल तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सेतू केंद्रामार्फत अर्ज केलेल्या खातेदार व लाभार्थींना विविध दाखले त्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
विविध दाखल्यांचे वाटप
अभियानाच्या पंधरवड्यादरम्यान नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. याअंतर्गत सेतू केंद्रामार्फत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट), अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) यासह विविध आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.
महसूल विभागाच्या ‘जिवंत 7/12’ मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या महसूलविषयक प्रलंबित कामांनाही गती देण्यात आली. यामध्ये वारस नोंद लावणे, अ.पा.क. शेरा कमी करणे तसेच वर्ग-2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर यासारख्या विविध कामांचा समावेश होता. या मोहिमेत एकूण 36 दाखले व 7/12 उतार्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले 15 उत्पन्न दाखले लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास मदत झाली.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत अधिक सुलभ पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमामुळे नागरिकांची प्रलंबित महसूलविषयक कामे मार्गी लागून आवश्यक दाखले वेळेत मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार गोपाळ पाटील, मंडळाधिकारी सुनीता चौधरी व तलाठी वैभव पाठे आदींची उपस्थिती होती.


