बनावट लिंकद्वारे जळगावातील महिलेची 87 हजारांची फसवणूक
जळगाव (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : कपड्यांची ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी न करता बनावट लिंक व क्यूआर कोड पाठवून महिलेची 87 हजार 219 रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण ?
प्रीती मुकेश बांगड (वय 41, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार त्यांनी 24 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन कपड्यांची ऑर्डर दिली होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरील एका अकाउंटवर संपर्क साधला. संबंधितांकडून कपड्यांची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र ऑर्डरची डिलिव्हरी न करता अज्ञात आरोपींनी फिर्यादींच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना डिलिव्हरीसाठी तसेच पेमेंट करण्याच्या नावाखाली विविध क्यूआर कोड आणि लिंक पाठविण्यात आल्या. आरोपींनी सांगितलेल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवून फिर्यादींनी ऑनलाईन पद्धतीने एकूण 87 हजार 219 रुपये ट्रान्सपर केले मात्र कपड्यांची डिलिव्हरी न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत.


