फत्तेपूर पोलिसांची धडक कारवाई : शेती साहित्याची चोरी करणारी जामनेर तालुक्यातील चौकडी जाळ्यात

चोरीचा मुद्देमाल खरेदी करणार्‍या भंगार दुकानदारालाही बेड्या : 70 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त


फत्तेपूर (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरी व बोअरवेलमधील विद्युत केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी चोरी करणार्‍या जामनेर तालुक्यातील चार आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणार्‍या एका भंगार दुकानदाराला अटक करण्यात आली. आरोपींकडून एकूण 70 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर तपासाला वेग
फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी, ता.जामनेर येथील शेतकरी गोपाळ प्रल्हाद कोल्हे तसेच परिसरातील इतर शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरी व बोअरवेलमधील विद्युत केबल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने फत्तेपूर पोलिसांनी तपास सुरू करीत 5 रोजी गुन्हा दाखल केला. गोपनीय माहितीच्या आधारे गणेश नारायण कोळी (24), शाहरुख अजित तडवी (28), प्रवीण धनराज गवळी (कोळी, 25), विकास गजानन जाधव (19, तोंडापूर, ता.जामनेर) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी चोरीचा मुद्देमाल भंगार व्यापारी राजीक खान लाड खान (30, अजिंठा, ता.सिल्लोड) यास विकल्याची कबुली दिल्यानंतर त्यालादेखील अटक करण्यात आली.

70 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून शंभर रुपये किंमतीचे कटर, पाच हजार रुपये किंमतीचे पाच किलो वजनाचे तांबे, 45 हजार रुपये किंमतीची विद्युत केबल, 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ईएन 0893) असा एकूण 70 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर सहा.पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !