जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक : राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
एक किमी स्प्रिंटमध्ये 1 मिनिट 19.19 सेकंदांची वेळ नोंदवत पटकावले सुवर्णपदक : राज्य व विद्यापीठ संघांतून राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी
जळगाव (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : ट्रॅक सायकलिंगमध्ये वेग आणि अचूकतेचा ठसा उमटवत जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे हिने पुणे विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या बळावर तिची अमृतसर येथे होणार्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीमुळे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही तिला मिळाली आहे. आकांक्षा ही जैन इरिगेशनमधील सहकारी जी.एम. म्हेत्रे यांची मुलगी आहे.
पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या पुणे विद्यापीठांतर्गत विभागीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षाने महिला गटाच्या एक किलोमीटर स्प्रिंट प्रकारात 1 मिनिट 19.19 सेकंदांची वेळ नोंदवली. प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिने प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या यशामुळे 18 ते 21 नोव्हेंबरदरम्यान अमृतसर येथे होणार्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तिचा मार्ग मोकळा झाला आहे.
आकांक्षाची राष्ट्रीय स्तरावरील ही या वर्षातील दुसरी महत्त्वाची संधी होय. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत तिने वरिष्ठ महिला गटात द्वितीय क्रमांक मिळवला होता. या कामगिरीच्या आधारे तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून, 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरदरम्यान रांची येथे होणार्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत ती राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. आकांक्षाने या पूर्वी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीबद्दल जैन इरिगेशन तसेच जळगावच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. राष्ट्रीय स्पर्धांत आपण चांगली कामगिरी करू असा आत्मविश्वास आकांक्षाला आहे.


