जळगावात पोलिसांनी गँगवारचा डाव उधळला : पाच जणांच्या आंतर जिल्हा टोळीला बेड्या

चार गावठी कट्टे, 9 जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि 62 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त ; गुन्हेगारी टोळीचे धाबे दणाणले


जळगाव (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : जळगाव शहरात गँगवार करण्याच्या उद्देशाने आलेल्या पाच जणांच्या आंतरजिल्हा टोळीला संयुक्त कारवाईत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत 35 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे उघड झाले असून संशयीतांकडून चार गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे, मोबाईल फोन, वाहन तसेच 62 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पाच आरोपींना अटक ; गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड
जळगाव गुन्हे शाखेसह रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 11 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री पिंप्राळा परिसरातील भवानीमाता मंदिर ते सिल्कमिल्समधील मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला. या कारवाईत पाच संशयितांना इनोव्हा कार (एम.एच.19 ए.ई.1355) मधून ताब्यात घेण्यात आले. अटकेतील संशयीतांमध्ये खुशाल गजानन बोरसे (खडका रोड, भुसावळ), संदीप बबन लोंढे (वाघनगर, जळगाव), राणू उर्फ ओमकार भदरगे (शास्त्री नगर, ठाणे), अरविंद विजय कांबळे (कासोळा, जि.वाशिम), सोनू महेंद्र जयस्वाल (सातीवली, वसई, जि.पालघर) यांना अटक करण्यात आली.






बंटी पथरोडसह चौघांनी रचला कट
पोलिसांच्या तपासात हत्या व लुटीचा कट मुख्य सूत्रधार बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर व रवी होळकरने रचल्याचे समोर आल्यानंतर त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. गुन्ह्यात अटकेतील खुशाल बोरसे, अरविंद कांबळे तसेच पसार बंटी व शिव पथरोडची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शस्त्र साठा व एम.डी.जप्त
अटकेतील आरोपींनी उमाळा येथे कटासाठी खोली घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पंचांसमक्ष या खोलीची झडती घेतल्यानंतर तेथून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, 62 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

मोठा शस्त्रसाठा जप्त
अटकेतील आरोपींकडून एकूण चार गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतुसे, धारदार सुरे, कोयते, मिरची पावडर, दोर्‍या, मास्क, पाच मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली. जप्त साहित्य व वाहनांची एकत्रित किंमत लाखो रुपयांत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

35 लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट
भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील पसार संशयीतांनी भुसावळातील मिथुन बारसे, कृष्णा बारसे आणि करण यांची हत्या करण्यासाठी 35 लाख रुपयांची सुपारी संशयीताना दिल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. 11 रोजी मिथून बारसे व क्रीश बारसे हे जळगाव शहरातील कांचननगर परिसरात एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा तसेच अंगावरील सोने लुटण्याचाही आरोपींचा कट असल्याचे पोलिसांनी प्रेस नोटनुसार कळवले आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, संतोष पवार, जितेंद्र वल्टे, सहा.निरीक्षक अंकुश वारुंगसे, हवालदार जितेंद्र राजपूत, नाईक योगेश बारी, कॉन्स्टेबल सुमेध इंधाटे, मुकूंद गवते, मनोज मराठे, सागर देवरे, प्रसाद जोशी, सुधाकर अंबारे, अनिल सोननी, अतुल चौधरी, जळगाव गुन्हे शाखेचे एएसआय अतुल वंजारी, सुनील दामोदरे, हवालदार किशोर पाटील, प्रवीण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, राहुल रगडे, छगन तायडे, रवींद्र कापडणे, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, मयूर निकम आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !