अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ! मध्यप्रदेशातील अट्टल घरफोडे जाळ्यात अटक ; तीन गुन्ह्यांची उकल
अमळनेर (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : अमळनेर शहरात बंद घरांचे कुलूप तोडून घरफोडी करणार्या मध्यप्रदेशातील दोन संशयित आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून सुमारे एक लाख 80 हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवलसिंह वनसिंह अलावा (39, काकडवा, ता.कुक्षी, जि.धार, मध्यप्रदेश) व केरू उर्फ केहरू इडिया डाबर (45, रा.बलेडी, गलबेडा, फलिया, ता.जोबट, अलीराजपूर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
अमळनेर शहर परिसरात घरफोडी करणार्या आरोपींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. अमळनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी अमळनेर शहरातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याची माहिती समोर आली.





तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल
31 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी अमळनेर शहरातील शेत परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले तर दुसर्या घटनेत 3 एप्रिल 2026 रोजी आरोपींनी अमळनेर शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यालगत असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवले होते शिवाय 24 ऑगस्ट 2026 रोजी एका कॉलनीतून 10 हजारांची रोकड, गणपती मूर्ती, लक्ष्मीचे गोण नाणे लांबवले होते. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हे दाखल होते.
एक लाख 580 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून सोन्याची गोळी, अंगठ्या, चांदीची गणपतीची मूर्ती आणि लक्ष्मीचे नाणे मिळून एकूण एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, नाईक सूर्यकांत साळुंखे, कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, उज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे, गुन्हे शाखेचे गौरव पाटील व मिलिंद जाधव आदींच्या पथकाने केली.
