कापूस चोरट्यांची जामनेर तालुक्यातील टोळी फत्तेपूर पोलिसांच्या जाळ्यात

दोन लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


फत्तेपूर (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : शेतातून कापूस चोरी करणार्‍या टोळीचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जामनेर तालुक्यातील शहापूरच्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत चोरीचा 40 किलो कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी मिळून एकूण दोन लाख 54 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेतातून 40 किलो कापसाची चोरी
फत्तेपूर हद्दीतील शेंगोळा येथील शेतकरी सदानंद कैलास जोशी (25) यांच्या शेतातून 9 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री अंदाजे एक ते दिड क्विंटल कापूस चोरीला गेल्याची तक्रार फत्तेपूर पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.






गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक
फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांना तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहापूर, ता.जामनेर येथील सैय्यद सोएब एजाज (31), सय्यद अनस महेमूद (19) व शेख मोहम्मद रेहान अब्दुल कादर (27, सर्व रा.शहापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चोरीचा 40 किलो कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी इको गाडी (क्रमांक एम.एच.20 एफ.वाय.2540) असा दोन लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व त्यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !