विज्ञान प्रदर्शनातून संशोधनवृत्तीसह वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना : भुसावळात चंद्रकांत साळुंखे
भुसावळातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 54 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उत्साहात समारोप
भुसावळ (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पकतेला, संशोधनवृत्तीला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्याची संधी मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये शिक्षकांसोबत पालकांचीही भूमिका महत्वाची असल्याचे मत डॉ.चंद्रकांत साळुंखे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील पंचायत समितीचा शिक्षण विभाग व के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 54 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन 2026-27 चा बक्षीस वितरण व समारोपप्रसंगी सोमवार, 12 रोजी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या समारंभाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रभाकर विठ्ठल पाटील, संस्थेचे ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सभासद विकास पाचपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, डॉ.जगन्नाथ दरंदले, जिल्हा परिषद जळगावच्या उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली, एन.एफ.चौधरी, विजय सरोदे, जळगाव जिल्हा अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांचे अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले.





मिळालेल्या संधीचे सोनं करा : डॉ.अनिल झोपे
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सादर केलेल्या विविध विज्ञान प्रतिकृती व प्रकल्पांमधून त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि वैज्ञानिक विचारांचे दर्शन घडले. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासोबतच नव्या संकल्पना आणि संशोधनाची आवड निर्माण होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनीही मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे मत डॉ.अनिल झोपे यांनी व्यक्त केले.
शिक्षक स्तरातून शशिकांत झांबरे प्रथम
शिक्षकांसाठी आयोजित उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत प्राथमिक शिक्षक स्तरातून के.नारखेडे विद्यालयाचे उपशिक्षक शशिकांत झांबरे तर माध्यमिक शिक्षक स्तरातून महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय वेल्हाळेतील राजेंद्र चौधरी तर प्रयोगशाळा सहाय्यक प्रायोगिक साहित्य प्रदर्शनीत के.नारखेडे विद्यालयाचे परिचर आसीफ तडवी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
प्राथमिक गटातून चैताली कोळी प्रथम
विद्यार्थ्यांसाठी आयोजित विज्ञान प्रतिकृतींमधून उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 6 वी ते 8 वी मधून जि.प.शाळा सावतर निंभोराची विद्यार्थिनी चैताली किरण कोळी व याच गटातून दिव्यांग विद्यार्थ्यांमधून नेहरू विद्यामंदिर तळवेलची पायल अनिल कोळी हिने प्रथम क्रमांक मिळवला. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर इयत्ता 9वी ते 12 वी मधून सर्वोदय हायस्कूल किन्ही या शाळेची विद्यार्थिनी आज्ञा विकास पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला.
पी.व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी कृतिशील राहावे, असे मत मांडले.
शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे परीक्षण डॉ.रुपेश तुळशीराम मोरे व रवींद्र युवराज चौधरी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रतिकृतींचे परीक्षण अविनाश मोरे, अर्चना निकम (उच्च प्राथमिक स्तर) आणि डॉ. पी. एस. कोळी, उल्हास श्रीराम पाटील (माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर) यांनी केले.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.धाडी, तुषार प्रधान आणि के.नारखेडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांनी विशेष प्रयत्न केले. विज्ञान प्रदर्शनाच्या तालुका संयोजन समितीतील एस.एस.अहिरे, सुनील वानखेडे, बी.पी.वारके, एस.एम.पाटील, नीलिमा पाटील, प्रशांत वंजारी, बी.बी.जोगी. ए.एम.जटाळे यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, विषयतज्ज्ञ आणि बी.आर.सी. स्टाफ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी के.नारखेडे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच के.एन.सी.टी.आय.चे विभागप्रमुख बी.ए.पाटील , भाऊसाहेब प्रमोद पाटील व संगणक विभागातील सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन कांचन राणे यांनी केले. विद्यार्थी मनोगत आदर्श हायस्कूला विद्यार्थी ऋषी फुलवाणी याने तर शिक्षक मनोगत डी.एल.हिंदी हायस्कूलच्या जयश्री सूर्यवंशी व परीक्षक मनोगत रवींद्र युवराज चौधरी यांनी व्यक्त केले. विजेत्या स्पर्धकांचे यादी वाचनासह उपस्थितांचे आभार तालुका संयोजन समिती सदस्य सुनील वानखेडे यांनी मानले.
