जळगावात विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ‘छोटा हत्ती’ वाहन उलटले : दहावर विद्यार्थी जखमी, दोघे गंभीर
जळगाव (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : शाळकरी विद्यार्थ्यांना नेणो छोटा हत्ती वाहन जळगावजवळील उमाळा फाट्याच्या परिसरात उलटले. या अपघातात 8 ते 10 विद्यार्थी जखमी असून त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घराकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात
इयत्ता आठवी, नववी आणि दहावीमध्ये शिकणारे काही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी उमाळा फाट्याजवळ बसची वाट पाहत उभे असताना ‘छोटा हत्ती’ वाहन आल्यानंतर हे कंडारी येथे जाण्यासाठी वाहनात बसले मात्र काही अंतरावरच वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर वाहन रस्त्यावर पलटी झाले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे वाहनातील विद्यार्थ्यांना दुखापत झाली. अपघाताचे नेमके स्वरूप आणि वाहन पलटी होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.





स्थानिकांकडून मदतकार्य; जखमींना रुग्णालयात हलवले
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना वाहनातून बाहेर काढून त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पालकांची रुग्णालयात धाव
अपघाताची बातमी समजताच जखमी विद्यार्थ्यांचे पालक आणि नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. आपल्या मुलांना दुखापत झाल्याचे समजल्यानंतर पालकांमध्ये घबराट पसरली. रुग्णालय परिसरात नातेवाईकांची गर्दी झाली होती. दरम्यान, अपघाताच्या कारणांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
